केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 ; अर्थसंकल्प सादर शेतकऱ्यांना काय मिळाले जाणून घ्या..
देशाच्या केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज (2024-2025) या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा झाल्या तसेच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना विशेष काय मिळाले या बाबतीत जाणून घेऊया.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. सरकारने कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये दिले आहेत. गेल्या वर्षी 1.25 लाख कोटी दिले होते. म्हणजेच यंदाच्या शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये 21.6 टक्के म्हणजेच 25 हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे. परंतु शेतकऱ्यांची महत्त्वाची मागणी असलेल्या किमान आधारभूत किंमती (हमीभाव) म्हणजेच एमएसपीबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. किसान सन्मान निधीची (PM kisan yojna) रक्कमही वाढवण्यात आलेली नाही.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा?
1) कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 21 टक्के वाढ
2) राज्यांच्या भागीदारीत कृषी आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल पायाभूत सुविधांवर काम करू.
3) 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती जमिनीच्या नोंदीमध्ये आणली जाणार आहे.
4) 5 राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी केले जातील
5) नैसर्गिक शेती वाढवण्यावर सरकारचा भर आहे.
6) ही योजना राबवू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाईल.
7) सरकार 32 पिकांसाठी 109 वाण आणणार आहे.
8) कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि कार्यक्षमता याला प्राधान्य दिले जाईल.
9) कृषी, रोजगार आणि सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले जाईल.
10)डाळी आणि तेलबियांची उत्पादकता आणि साठवणूक वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (मंगळवारी) सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात रोजगार, कौशल्य विकास, कृषी आणि उत्पादन यावर लक्ष केंद्रित करून 2047 पर्यंत \’विकसित भारत\’चा रोडमॅप तयार केला आहे असे निर्मला सीतारामन् यांनी सांगितले आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या हमीभावाबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही तसेच पिएम किसान योजनेबाबत काही बदल झाला नाही.