सोयाबीन कापूस अनुदान शासन निर्णय आला ; या शेतकऱ्यांना 20 हजार रुपये अनुदान मिळणार
सोयाबीन कापूस अनुदान ; मा. उप मुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त यांनी दि.०५ जुलै, २०२४ रोजी, सन २०२४ – २५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, कापूस व सोयाबीन पिकांचा उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३ – २४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाच्या दि. ११ जुलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबत शासन निर्णय येथे पहा. (कापूस सोयाबीन अनुदान GR)
त्याअनुषंगाने संदर्भिय शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरचे अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठीची कार्य पध्दती निश्चित करून दि. 30/ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पिक पाहणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पिक ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य वितरीत करण्यासाठीची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे निश्चित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
(१) जमाबंदी आयुक्त, कार्यालयाकडून ई-पिक पाहणी पोर्टलवरील सन २०२३ मधील खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतक-यांची माहिती / डेटा MahalT च्या Cloud वर प्राप्त झालेली आहे.
(२) सदरची माहिती / डेटा आयुक्त, कृषि यांचे कार्यालयाकडून जिल्हा, तालुका निहाय क्षेत्रिय यंत्रणांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरची माहिती कृषि सहाय्यकांकडून गावनिहाय संबंधित गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनीभागात ठळकपणे लावण्यात येईल.
(३) या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह कृषि सहाय्यकांकडे उपलब्ध करून द्यावी.
(४) सामायिक खातेदारांबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम, सदर सामाईक खात्यातील एका खातेदार यांचे नावावर इतर सह हिस्सेदार यांचे संमतीने जमा करण्यात येईल.त्या साठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित प्रपत्रात त्यांचे ना हरकत पत्र आणि ज्यांचे नावावर मदतीची रक्कम जमा करावयाची आहे, त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह संबंधित कृषि सहाय्यकांकडे द्यावी.
उदा. एक शेतकरी किंवा खातेदार यांचे कडे सोयाबीन २ हेक्टर आणि कापूस २ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४ हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पिक २ हेक्टरच्या मर्यादेत रु. ५०००/- प्रति हेक्टर नुसार दोन्ही पिकांचे मिळून एकूण रु.२०,०००/- अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.